बंगळुरू : डीएनए नमुने केवळ साहाय्यभूत पुरावे आहेत. त्यामुळे ते न जुळल्याने आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध होणार नाही, असे स्पष्ट करत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका ४३ वर्षीय बस वाहकाची याचिका फेटाळून लावली.
या वाहकावर नात्यातील १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती बनवल्याचा आरोप आहे. डीएनए तपासणीत भ्रूण व बस वाहक यांचे रक्त नमुने जुळले नाहीत. त्यामुळे आरोपीने आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पीडितेच्या आईने १९ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. बस वाहकाने मुलीचे लैंगिक शोषण केल्यामुळे ती गर्भवती झाली, असा आरोप आहे.
डीएनएचे नमुने जुळले नसतानाही खटला सुरू ठेवावा लागेल, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी याबाबत १५ सप्टेंबर रोजी निकाल दिला. डीएनए तपासणीतून आरोपी भ्रुणाचा जैविक पिता नव्हता हे स्पष्ट होत असले तरी याचिकाकर्त्याची लैंगिक गुन्ह्याच्या आरोपातून निर्दोष सुटका होऊ शकणार नाही. आरोपीने बळजबरी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा जबाब जबाब फेटाळता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
आरोपीचा युक्तिवादडीएनए अहवाल प्रलंबित असताना पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. आरोपी आणि भ्रूण यांच्या रक्ताचे नमुने जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. पीडित मुलगी गर्भवती होण्यास आपण जबाबदार नाही, असा युक्तिवाद करत केला होता.