Karnataka Doctor Dismissed For Photo Shoot In OT: सरकारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये होणाऱ्या पत्नीसोबत प्री-वेडिंग फोटोशूट केल्याप्रकरणी डॉक्टरावर कारवाई करण्यात आली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये फोटोशूट करणं डॉक्टराला चांगलंच भोवलं. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात ही घटना घडली. घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी शुक्रवारी डॉक्टराला सेवेतून बडतर्फ केलं.
राव म्हणाले की, सरकारी रुग्णालये ही जनतेची सेवा करण्यासाठी असतात, वैयक्तिक कामांसाठी नसतात. मी अशी अनुशासनात्मकता कधीच खपवून घेणार नाही. इतर कर्मचाऱ्यांनी देखील यातून बोध घेऊन त्यांनी असे प्रकार करू नयेत. सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्तव्ये पार पाडावी लागतील. सरकारी रुग्णालयांच्या जागेचा गैरवापर करू नये, अशा सूचना मी संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?भरमसागर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर अभिषेक यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. खरं तर डॉ. अभिषेक यांनी नुकतेच रूग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट केलं. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, डॉक्टर अभिषेक हे एका रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि त्यांची होणारी पत्नी त्यांच्यासमोर उभी राहून त्यांना मदत करत असल्याचे दिसते. शेजारी उभे असलेले इतर सहकारी हसत आहेत आणि ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली जात आहे तोही उठून बसतो आणि जोरात हसायला लागतो. लक्षणीय बाब म्हणजे ज्याच्यावर शस्त्रक्रिया करत असल्याचे दाखवण्याते आले तो खरा रुग्ण नसून शुटींगसाठी नाटक करण्यात आले.