राँग साईडने वाहन चालविणे नेहमी धोकादायक असते. अनेकदा ते समोरच्या वाहनाला अडथळा ठरते व अपघात होतात. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेववर शनिवारी मध्यरात्री एक डबलडेकर बस आणि कारची जोरदार टक्कर झाली. कार राँग साईडने येत होती, यामुळे तिसऱ्या लेनमध्ये असलेल्या बस चालकाला बस अचानक थांबविता आली नाही व या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला.
बसमधील ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. टक्कर एवढी जोरदार होती की कार थेट एक्स्प्रेस वेच्या खाली जाऊन कोसळली. जखमींना सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठविण्यात आले आहेत.
एसएसपी संजय कुमार यांनी सांगितले की, कारमधील ३ आणि बसमधील तीन अशा सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बस लखनऊहून आग्र्याला जात होती. तर झायलो कार राँग साईडने लखनऊकडे येत होती. यामुळे हा अपघात झाला. बसचा स्पीड जास्त असल्याने कार चेंडूसारखी उडून हायवेच्या खाली कोसळली. या अपघातानंतर मोठा आरडाओरडा सुरु झाला.
डबल डेकर बस आणि कारची धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. धडकेनंतर बसचा पुढील भाग निखळला आहे. तर कार २० फूट खोल खाली कोसळली. बस जागेवरच थांबल्याने पुढील अनर्थ टळला आहे.