मागच्या काही काळापासून वाढत्या विजबिलांमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. दरम्यान, वाढत्या विजबिलांमुळे त्रस्त होऊन एका तरुणानं जीवन संपल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे घडली आहे. छोट्याशा घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही अशी मोजकीच विजेवर चालणारी उपकरणं असताना या तरुणाच्या घरचं विजेचं बिल एक लाख रुपयांच्या वर आलं होतं. पुढच्याच महिन्यात पुन्हा एकदा या तरुणाच्या घरचं विजबिल अव्वाच्या सव्वा आलं, त्यामुळे मानसिक धक्का बसून तणावाखाली गेलेल्या या तरुणाने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.
या प्रकरणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. विजेचं बिल वाढवून पाठवण्यात आल्याने त्रस्त असलेल्या आमच्या मुलानं जीवन संपवलं. आमच्या तक्रारींचीही दखल घेतली गेली नाही. दरम्यान, सदर तरुणाने कौटुंबिक कारणांमुळे जीवन संपवल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल ऊर्जा मंत्र्यांनी घेतली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
ही संपूर्ण घटना उन्नावमधील अचलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपूर वसैना गावातील आहे. येथील शुभम राजपूत हा तरुण मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. शुभमच्या वडिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की, मागच्या महिन्यात वीज विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या घरातील विजेचं बिल हे एक लाख रुपयांपेक्षा अधिक आलं होतं. या महिन्यातही विजेचं बिल हे ८ हजार रुपये आलं. त्यामुळे आमचा मुलगा त्रस्त झाला होता. एवढं बिल कुठून भरायचं, या चिंतेत होता. त्यामधूनच त्याने अखेरीस टोकाचं पाऊल उचललं.
शुभम याने २०२२ मध्ये ६०० रुपये जमा करून विजेची जोडणी घेतली होती. त्याच्या घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक टीव्ही या व्यतिरिक्त विजेचं कुठलंही उपकरण नव्हतं. तरीही १ सप्टेंबर २०२४ रोजी त्याला वीज विभागाकडून १ लाख ९ हजार एवढं विजेचं बिल आलं होतं. त्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर वीज विभागाने विजेचं बिल घटवून १६ हजार ३७७ रुपये एवढं कमी केलं. शुभमने हे बिलं १४ सप्टेंबर रोजी कसंबसं भरलं. मात्र पुन्हा ७ ऑक्टोबर रोजी विजेचं बिल ८ हजार २३३ रुपये एवढं आलं. त्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला आणि त्याने जीवन संपवलं.