बेळगाव : मध्य प्रदेशातील मोरेना येथे भारतीय वायु दलाच्या दोन लढाऊ विमानांच्याअपघातात वीरमरण पत्करलेले संभाजीनगर, गणेशपूर हिंडलगा येथील सुपुत्र विंग कमांडर हनुमंतराव रेवणसिद्धय्या सारथी यांचे पार्थिव रविवारी दुपारी वायुदलाच्या विशेष विमानाने बेळगावला आणण्यात आले.शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी यांचे पार्थिव असलेल्या भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाच्या लँडिंगसाठी बेळगावच्या सांबरा विमानतळावर खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सांबरा येथील भारतीय हवाई दल केंद्रातर्फे त्यांना खास मानवंदना देण्यात आली.याप्रसंगी हवाई दल केंद्राच्या प्रमुखांसह हवाई दलाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मानवंदना दिल्यानंतर फुलांनी सजविलेल्या संरक्षण दलाच्या ट्रकमधून शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी यांचे पार्थिव संभाजीनगर, गणेशपूर हिंडलगा येथील त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात आले.बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या जिल्हा पंचायत सीईओ एच. वी. दर्शन आणि आमदार अनिल बेनके यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. दरम्यान, गणेशपूर येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेताना ठिकठिकाणी शहरात विंग कमांडर सारथी यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
बेळगावातील हिंडलगाचे सुपुत्र विंग कमांडर यांना अखेरची मानवंदना, मध्य प्रदेशात लढाऊ विमानांच्या अपघातात वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 4:23 PM