गुरुग्राम : हरयाणातील नूह जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एका धावत्या बसला आग लागून त्यातील नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला व १५ जण जखमी झाले. त्यातील प्रवासी मथुरा, वृदांवन येथे तीर्थयात्रा करून आपल्या गावी परत जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. त्यातील प्रवासी पंजाबमधील होशियारपूर, लुधियाना येथील रहिवासी आहेत. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी रात्री २ वाजता आग लागली त्यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. कुंडली-मनेसर-पालवाल या एक्स्प्रेस वेवर बसला आग लागून त्यात सहा महिला, तीन पुरुष होरपळून मरण पावले. जखमी पंधरा लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसला कशामुळे आग लागली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नसून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.बसला आग लागल्याचे लक्षात येताच काही स्थानिक नागरिकांनी या बसचा पाठलाग केला. त्यानंतर चालकाला सावध करून बस थांबवायला सांगितली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस तसेच अग्निशमन दलाला हा प्रकार कळविला. हरयाणातील नूह जिल्ह्यातील भीषण बस दुर्घटनेचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
उपचार सुरू असलेल्या जखमींची प्रकृती स्थिरनूह जिल्ह्यामध्ये बसला आग लागून झालेल्या जीवितहानीबद्दल हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींवर शासकीय रुग्णांलयात उपचार सुरू असल्याची त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीदेखील सदर अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.