नवी दिल्ली : दिल्लीतील एम्समध्ये आज सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आपत्कालीन विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे कळते. अग्निशमन दलाची सहा पथके घटनास्थळी पोहोचले असून सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एम्सच्या एण्डोस्कॉपी कक्षात ही आग लागली. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना जुन्या इमारतीत पाठवण्यात येत असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात येत असून लवकरात लवकर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहितीनुसार, ११.५४ वाजता आग लागली असल्याचे समोर आले, त्यानंतर अग्निशमन दलाची सहा पथके घटनास्थळी दाखल झाली. इमर्जन्सी वॉर्डजवळील एण्डोस्कॉपी कक्षात ही आग लागली.