हैदराबाद – शहरातील नामपल्ली भागात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहेत. आगीत सुमारे २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. नामपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील बाजार घाटात चार मजली अपार्टमेंटच्या खाली असलेल्या केमिकल गोदामात अचानक आग लागली. अनेक ड्रम केमिकलने भरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, केमिकलनं भरलेल्या आगीच्या ड्रमनं पेट घेतला आणि पाहता पाहता ही आग संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरली. आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपार्टमेंटमध्ये केमिकल ठेवणे हा मोठा हलगर्जीपणा मानला जात आहे. घटनास्थळाचे जे व्हिडिओ समोर आलेत त्यात आगीनं रौद्ररुप धारण केल्याचे दिसून येते. आकाशात आगीचे धूर पसरले होते. अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे बरेच प्रयत्न करत होते. परंतु ही आग इतकी भयंकर होती की धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते.
या परिसरात इतरही अनेक घरे आहेत मात्र सध्यातरी जवळपासच्या घरांचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. इमारतीत अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेरून पायऱ्या चढवून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, इमारतीजवळच्या तीव्रतेने आगीच्या झळा बसत होत्या. या अपघातात अनेक वाहने जळून खाक झाली. अनेक दुचाकींना आग लागली. इमारतीबाहेर उभी असलेली कारही जळाली. कार आणि दुचाकी इमारतीत राहणाऱ्या लोकांची होती की दुरुस्तीसाठी पार्क केली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली
अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. अनेक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र इमारतीतून प्रचंड धुराचे लोट बाहेर पडत होते. महिला व लहान मुलांनाही याच मार्गाने बाहेर काढण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.