नवी दिल्ली: भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी-१४ डब्यातील बॅटरीला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कोणत्याही दुखापतीची नोंद नाही.
राणी कमलापतीहून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी-१४ डब्याला आग लागली होती. गाडी क्रमांक २०१७१ भोपाळ-हजरत निजामुद्दीन वंदे भारत पहाटे ५.४० वाजता निघाली. बीनासमोर ही घटना घडली. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार बॅटरीमधून आग लागली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर घटनेमुळे जवळपास १ तास एकाच जागेवर थांबून होती.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सी-१४ कोचमधील बॅटरीजवळ धूर निघत होता. यानंतर बॅटरी बॉक्समधून ज्वाळा निघू लागल्या. बिना रेल्वे स्थानकापूर्वी कुरवाई केथोरा येथे गाडी थांबवण्यात आली आणि प्रवासी सुखरूप उतरले.