न्यू जलपायगुडी / कोलकाता : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये सोमवारी सकाळी एका मालवाहू रेल्वेगाडीने दिलेल्या जोरदार धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू, तर ४१ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर दोन्ही रेल्वेगाड्यांच्या चालकांना पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली टीए ९१२ ही लेखी परवानगी देण्यात आली होती. कांचनजंगा एक्स्प्रेस आगरतळाहून सियालदहला जात होती. पश्चिम बंगालमधील छत्तरहाट जंक्शन व राणीपतरा रेल्वे यांच्यादरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उभी असताना रेल्वेमार्गावर मागून आलेल्या मालगाडीने या प्रवासी गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे कांचनजंगा एक्स्प्रेसचे दोन डबे तत्काळ रुळावरून घसरले, तर आणखी एक डबा मालगाडीच्या इंजिनाखाली अडकून लटकत होता.
मृतांमध्ये मालगाडीचा चालक व सहचालकाचाही समावेश आहे, तर काचनजंगा एक्स्प्रेसचा गार्ड जखमी झाला आहे. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागातील खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्याचे वृत्त कळताच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव तातडीने अपघातस्थळी रवाना झाले. त्यांनी तिथे चाललेल्या बचावकार्याची पाहणी केली. या अपघातामुळे पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाखांची मदत या अपघातात मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी २.५ लाख रुपये व किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्यात येईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
मालगाडी चालकाने वेगाचा नियम मोडला
सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला असताना व पुढे जाण्यासाठी आवश्यक टीए ९१२ ही लेखी परवानगी दिली असतानाही रेल्वेचा वेग किती ठेवायचा याबद्दलच्या नियमांचे मालगाडीच्या चालकाने उल्लंघन केले असे रेल्वे बोडनि सोमवारी म्हटले आहे. मालगाडी किती वेगाने धावत होती याचा तपशील मात्र रेल्वे बोडनि दिलेला नाही.
रेल्वे प्रशासन चौकशी करणार
- कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाला, त्या रेल्वेमार्गावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सोमवारी पहाटे ५:५० वाजल्यापासून बिघाड झाला होता. त्यामुळे या दोन्ही गाड्यांना पुढे जाण्यासाठी हवी असलेली टीए ११२ ही परवानगी देण्यात आली होती.
- सिग्नलमध्ये बिघाड असेल व सर्वत्र लाल सिग्नल असेल तर अशा वेळी चालकाने ताशी १० किमीच्या वेगाने रेल्वेगाडी चालविणे व प्रत्येक सिग्नलजवळ ही गाडी एक मिनिट थांबविणे आवश्यक असते.
- मालगाडी, कांचनजंगा एक्स्प्रेसच्या चालकांनी हा नियम पाळला होता का याचीही आता रेल्वे प्रशासन चौकशी करणार आहे. दुःखदायक घटना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे की, कांचनजंगा एक्स्प्रेस व मालगाडीचा झालेला अपघात व त्यात झालेली जीवितहानी ही दुःखदायक घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, रेल्वे अपघाताची घटना वेदनादायी आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला झालेला अपघात दुर्देवी आहे.
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांनी अपघातस्थळी जाऊन तेथील स्थितीची पाहणी केली.