कोलकाता : कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्येमुळे चर्चेत आलेल्या आर. जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलवर ४० समाजकंटकांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री अचानक हल्ला केला. पोलिसांना मारहाण करण्याबरोबर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हल्लेखोरांनी आंदोलनाला बसलेल्यांनाही मारहाण केल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ४० लोक आंदोलकांच्या रूपात मुखवटा धारण करून रुग्णालयाच्या आवारात घुसले आणि तेथे आंदोलकांनी बांधलेले स्टेज नासधूस करू लागले. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांवरही त्यांनी दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्यातील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र हे समाजकंटक रुग्णालयात शिरले आणि त्यांनी लाठ्या, विटा आणि रॉडने बाह्य रुग्ण विभागासह (ओपीडी) इमर्जन्सी वॉर्ड, त्याचे नर्सिंग स्टेशन आणि औषध दुकानाची तोडफोड केली. या हल्लेखोरांनी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरेदेखील नष्ट केले. पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच महिला डॉक्टर हत्येच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना कडक शिक्षेबरोबरच रुग्णालयातील महिला सुरक्षेच्या मागणीसाठी देशभरात निषेध आंदोलन सुरू आहे. मात्र या परिस्थितीत कार हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या उपस्थितीतच अशी हल्ल्याची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर झाल्याचा आरोप विविध वैद्यकीय कर्मचारी संघटनांनी केला आहे.
हल्ल्यामागे विरोधक : ममता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी येथील हॉस्पिटलवरील हल्ल्याचा निषेध करताना यामागे विरोधी पक्षांचा हात असल्याचा आरोप केला. अशा घटनांद्वारे भाजप आणि डाव्या पक्षांचे काही बाहेरील नेते बंगालमध्ये अडचणी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, सीसीटीव्ही फुटेजवरून हल्ल्याच्या मुळाशी जाता येईल. या हल्ल्यात रुग्णालयाचे दोन मजल्यांचे नुकसान झाले असून ते पूर्ववत होण्यासाठी तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. डॉक्टर हत्येप्रकरणातही संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला देण्यात आली आहेत.
आमचे मनोधैर्य आणखी वाढलेय
हल्ला म्हणजे आंदोलक डॉक्टरांचे मनोधैर्य तोडण्याचा प्रयत्न असून आम्ही आंदोलनातून माघार घ्यावी, अशी काहींची इच्छा आहे. पण या हल्ल्याच्या घटनेने उलट आमचा निर्धार आणखी मजबूत झाला आहे, असे एका आंदोलक डॉक्टरांनी सांगितले.