एका 13 वर्षांच्या चिमुरडीने आपल्या बुद्धीमत्तेचा परिचय देत अॅलेक्साच्या मदतीने माकडांना घरातून पळवून लावले आणि स्वतःसह आपल्या लहान बहिणीचाही जीव वाचवला. ही घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात घडली. यानंतर, महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी या धाडसी चिमुरडीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे. या कन्येने लढवलेली शक्कल पाहून महिंद्रा अत्यंत खूश झाले असून, त्यांनी या मुलीला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आपली कंपनी जॉइन करण्याची ऑफर दिली आहे.
संबंधित चिमुरडी आपल्या लहान बहिणीसह घरी होती. याच वेळी काही माकडं त्यांच्या घरात शिरले. या माकडांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या मुलीने अॅलेक्साची मदत घेतली. मुलीने अॅलेक्साला कुत्र्याचा आवाज काढायला सांगितले. या चिमुरडीची ही युक्ती कामी आली आणि कुत्र्यांचा भुंगण्याचा आवाज ऐकून सर्वच माडांनी धूम ठोकली. अशा पद्धतीने या 13 वर्षांच्या चिमुरडीने माकडांपासून स्वतःसह आपल्या लहान बहिणीचाही बचाव केला.
आनंद महिंद्रा खूश -या घटनेवर प्रतिक्रिया देत आनंद महिंद्रा यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "आपण तंत्रज्ञानाचे गुलाम आहोत की मालक? हा या युगातील मुख्य प्रश्न आहे. या मुलीची ही गोष्ट आपल्याला दिलासा देते की, तंत्रज्ञान नेहमीच मानवी कल्पकतेला सक्षम बनवेल. या मुलीत कुठल्याही बिकट परिस्थितीचा सामना करण्याची पूर्ण क्षमता आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, या मुलीने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करायचे ठरवल्यास, आपली कंपनी महिंद्रा तिला आपल्यासोबत जोडण्यास उत्सुक असेल.