आजच्या धावपळीच्या जगात मोबाईल एक गरज बनली आहे. पण, लहानग्यांपासून ज्येष्ठांना आपले व्यसन लावणाऱ्या मोबाईलचे दुष्परिणाम देखील अनेक आहेत. याचाच प्रत्यय देणारी घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. येथील खैरागड-चुईखदान-गंडई जिल्ह्यातील घटनेने एकच खळबळ माजली. १४ वर्षीय बहिणीने १८ वर्षीय भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित तरूणीला तिच्या भावाने मोबाईल वापरण्यास मनाई केली असता, त्यानंतर तिने भावावर कुऱ्हाडीने वार केले ज्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटना घडली तेव्हा १४ वर्षीय मुलगी आणि तिचा १८ वर्षीय भाऊ दोघेच घरात होते. यावेळी घरातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी ती तिच्या भावासोबत घरी एकटी होती. मुलीच्या मृत भावाचे नाव देवप्रसाद वर्मा असे आहे.
भाऊ बहीण घरी एकटे असताना देवप्रसादने तिच्या बहिणीला फोन न वापरण्यास सांगितले. देवप्रसादने आपल्या बहिणीला इतर मुलांशी न बोलण्याचा वारंवार सल्ला दिला. तरी देखील बहिणीने न ऐकल्याने तो काही वेळाने घरात जाऊन झोपला. भावाचे बोलणे ऐकून संतापलेल्या बहिणीने तो झोपलेल्या अवस्थेत असताना कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
१४ वर्षीय तरूणीने केली हत्यादरम्यान, देवप्रसाद झोपला असता त्याच्या बहिणीने कुऱ्हाडीने वार केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ती आंघोळीसाठी गेली आणि तिच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग काढले. यानंतर ती घरातून बाहेर आली आणि तिने आपल्या भावाचा कोणीतरी खून केल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. हे ऐकून स्थानिकांनी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. मग पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी त्यांनी संशयावरून मुलीची चौकशी केली असता तिने सत्य सांगितले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.