अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पहिली दिवाळी साजरी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येची दिवाळी जगभर प्रसिद्ध असून पुन्हा एकदा ही दिवाळी चर्चेत आली आहे. बुधवारी (३० ऑक्टोबर) अयोध्येत दीपोत्सव सोहळ्यादरम्यान उत्तर प्रदेशने दोन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवले.
एकाच वेळी सर्वाधिक लोक दिवे लावतात आणि तेलाच्या दिव्यांच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनासाठी हे रेकॉर्ड केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभाग आणि अयोध्या जिल्हा प्रशासनाने 25,12,585 लाख दिवे लावून हा विक्रम केला आहे. कार्यक्रमादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गिनीजच्या अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र स्विकारले.
आठव्या दीपोत्सवानिमित्त सरयू नदीच्या काठावर 25 लाखांहून अधिक मातीचे दिवे प्रज्वलित करून सर्वाधिक दिवे लावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. स्थानिक कारागिरांना दिव्यांची ऑर्डर देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी समारंभाचे नेतृत्व केले आणि त्यांच्या मंत्रिमंडळ सदस्यांसह पहिले काही दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंह देखील उपस्थित होते. या वर्षी 22 जानेवारीला राम लला मंदिराच्या अभिषेकानंतर हा पहिला दीपोत्सव होता.
यानिमित्ताने संपूर्ण शहर सजवण्यात आले असून प्रभू रामाला समर्पित संगीतमय कार्यक्रम होते. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवरांनी राम मंदिराला भेट दिली.
'दीपोत्सव-2024'च्या शुभ मुहूर्तावर 'राममय' श्री अयोध्या धामने पुन्हा 25 लाखाहून अधिक दिवे लावून सनातन संस्कृतीचा उत्सव साजरा केला आहे आणि सर्वाधिक दिवे लावण्याचा जागतिक विक्रम केला आहे.