इंडिया आघाडीच्या बाजूने छुपी लाट; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:08 AM2024-05-22T10:08:40+5:302024-05-22T10:09:26+5:30
काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला.
बलवंत तक्षक -
नवी दिल्ली : काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला लोकांचा प्रतिसाद लक्षणीय बदलला आहे आणि आघाडीच्या बाजूने मोठी छुपी लाट आहे, जी लोकसभेत बहुमत मिळवण्यापासून भाजपला रोखू शकेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी व्यक्त केला. समाजात द्वेष व फूट पसरवणाऱ्या भाजप व आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध लढत जनताच आता आमच्यासाठी आहे, असा दावाही खरगे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला.
‘देशभर फिरल्यानंतर, आमच्या बाजूने छुपी लाट असल्याची जाणीव होत आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीतील भागीदारांना यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही भाजपला जागा मिळण्यापासून रोखू शकू. मला वाटते की, भाजप आपले सरकार स्थापन करू शकणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्याची हाक ही सर्व भारतीयांचे मूलभूत हक्क व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी आहे. खरगे म्हणाले की, २००४ मध्येही अशाच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या; परंतु यूपीए सरकारने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात दोन कार्यकाळ पूर्ण केले.
महगाई आणि बेरोजगारी दोन प्रमुख मुद्दे
या निवडणुकीत महागाई आणि बेरोजगारी, हे दोन प्रमुख मुद्दे समोर आले असून त्यामुळे लोकांत नाराजी आहे. आरक्षण आणि राज्यघटना हे दोन मुद्देही कळीचे ठरत आहेत. दोन कोटी नोकऱ्या, परदेशातील काळा पैसा परत आणणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, याआधी दिलेली आश्वासनेही भाजप पूर्ण करू शकलेली नाही, असेही खरगे म्हणाले.
त्यांना लोकशाही संपवायची
जगाधारी (हरयाणा) : भाजपला लोकशाही संपवायची आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी येथील प्रचारसभेत केला. काँग्रेस आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध लढत आहे. तुम्ही राज्यघटना हिसकावून घेत आहात आणि आम्ही त्याविरोधात लढत आहोत. तुम्हाला लोकशाही संपवायची आहे आणि आम्ही त्यासाठी लढत आहोत, असे खरगे म्हणाले.