चेन्नई : भारतीय लष्कराच्या चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून (ओटीए) १८६ अधिकाऱ्यांच्या तुकडीने नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामध्ये ३५ महिलांचा समावेश आहे. लडाख व जालंधर येथील दिवंगत लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील आपल्या पतीच्या इच्छेला प्रमाण मानून लष्करी अधिकारी बनल्या आहेत. त्यातील रिग्झिन चोरोल या लडाखमधून भारतीय लष्करात रुजू झालेल्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरल्या आहेत.
रिग्झिन चोरोल यांचे पती व लष्करी अधिकारी रिग्झिन खांडप यांचा सेवा बजावत असताना एका घटनेत मृत्यू झाला होता. मी लष्करी अधिकारी व्हावे, अशी पतीची इच्छा होती. त्यांचे स्वप्न मी आता पूर्ण केले आहे, असे चोरोल यांनी सांगितले. अर्थशास्त्र या विषयातील पदवीधर असलेल्या रिग्झिन चोरोल यांना एक मुलगा आहे. ओटीएमधील ११ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांना आपल्या मुलापासून लांब राहावे लागले होते.
रिग्झिन चोरोल यांना नॉर्थन कमांडच्या अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले. चेन्नईतील ओटीए संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील एक वकील रुद्राक्षसिंह पुरोहित, आयटी कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन लष्करी सेवेकडे वळलेल्या दोन युवकांचाही समावेश आहे. रुद्राक्षसिंह यांचे आजोबा लष्करात सुभेदार होते. त्यांच्यापासून रुद्राक्षसिंह यांनी प्रेरणा घेतली.
पंजाबच्या जालंधरमधील एका खासगी शाळेत शिक्षिका असलेल्या हरवीन कौर कल्हन यादेखील आता लष्करात अधिकारी बनल्या आहेत.त्यांचे पती व लष्करी अधिकारी कॅप्टन कन्वलपाल सिंग कल्हन यांचा एका घटनेत मृत्यू झाला. हरवीन यांनी लष्करी अधिकारी बनावे असे त्यांच्या पतीचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. ओटीएमधून त्यांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे.