NEET UG पेपर लीक प्रकरणी सीबीआयच्या पथकाने एका पत्रकाराला अटक केली आहे. हजारीबाग येथील पत्रकार जमालुद्दीन याला सीबीआयने अटक केली आहे. नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयने केलेली ही पाचवी अटक आहे. यापूर्वी सीबीआयने ओएसिस स्कूल हजारीबागचे प्राध्यापक एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम, मनीष आणि आशुतोष यांना अटक करण्यात आली होती. पत्रकार जमालुद्दीन हा कथितपणे डॉ. हक आणि आलमची मदत करत होता.
तपासादरम्यान, सीबीआयच्या पथकाला प्राध्यापक एहसान उल हकसोबत दोन पत्रकारांचं कनेक्शन असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यापैकी एक पत्रकार असलेल्या जमालुद्दीन याला अटक करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला पत्रकार हा झारखंडमधील एका हिंदी दैनिकाचा कर्मचारी आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही लोकांची चौकशी केली जात आहे. तसेच यानंतर आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
पत्रकार आणि प्राध्यापक यांच्यादरम्यान पेपर लीक आणि नीट परीक्षेदरम्यान सातत्याने बोलणं होतं होतं. एहसान उल हकच्या कॉल डिटेल्सच्या आधारावर पत्रकाराला सीबीआयने चौकशीसाठी बोलावलं होतं.
सीबीआयने नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास आपल्या हातात घेतल्यानंतर तपासाला कमालीचा वेग आला आहे. बिहारच्या इकॉनॉमिकल ऑफेन्स युनिटने आपल्या तपासामध्ये हजारीबागच्या ज्या ओयॅसिस स्कूलशी तपासाची कडी जोडली होती. त्यावरून पुढील तपास करत सीबीआय संजीव मुखिया टोळीचा संपूर्ण प्लॅन समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.