चंडीगड/लाहोर : विविध गुन्ह्यांत भारताला हवा असलेला खलिस्तानी दहशतवादी परमजितसिंग पंजवारची पाकच्या लाहोर शहरात शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.
पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेला परमजितसिंग पंजवार (वय ६३ वर्षे) हा खलिस्तान कमांडो फोर्स-पंजवार गट या संघटनेचे नेतृत्व करत होता. या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. अमली पदार्थ, शस्त्रे यांची तस्करी तसेच घातपाती कारवाया या संघटनेकडून करण्यात येत असत. पंजवार याला भारताने जुलै २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. लाहोरमध्ये शनिवारी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. त्यावेळी पंजवार त्याच्या हाउसिंग सोसायटीच्या आवारात मॉर्निंग वॉक करत होता.
ड्रग्ज तस्करीही
गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, परमजितसिंग बनावट नोटा, अमली पदार्थांची तस्करी करायचा. दहशतवाद सोडलेल्यांना पुन्हा कारवायांत भाग घ्यावा याकरिता तसेच स्लीपर सेलमार्फत घातपातासाठी कारवाया घडवण्यासाठी तो प्रयत्न करीत होता.