हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशमधील पन्ना येथे हिऱ्यांच्या खाणीतून सापडलेल्या हिऱ्यांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय लिलावामध्ये हिऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बोली लागल्या. या लिलावामध्ये ३२ कॅरेट ८० सेंटचा जेम्स क्वालिटीचा हिरा मुख्य आकर्षण राहिला. हा हिरा सरकोहा येथे स्वामिदीन पाल नावाच्या एका मजुराला सापडला होता. हा हिरा ६ लाख ७६ हजार रुपये प्रति कॅरेटच्या हिशोबाने २ कोटी २१ लाख ७२ हजार रुपयांना विकला गेला. हा हिरा पन्ना येथील व्यापारी सतेंद्र जडिया यांनी खरेदी केले. दरम्यान, या हिऱ्याच्या विक्रीमधून जी रक्कम मिळेल त्यामधून घर आणि शेतजमीन खरेदी करणार असल्याचे स्वामीदीन याने सांगितले.
हिरे अधिकारी रवी पटेल यांनी सांगितले की, या लिलावाच्या शेवटच्या दिवशी २२ ट्रेच्या माध्यमातून २५ नग हिरे लिलावासाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ३२ कॅरेट ८० सेंटच्या हिऱ्याचाही लिलाव झाला. तीन दिवस चाललेल्या हिरे लिलावामध्ये पन्नाबरोबरच सूरत, गुजरात, राजस्थान आदि ठिकाणचे व्यापारी सहभागी झाले होते. यावेळी लिलाव आणि हिरे खरेदीबाबत व्यापाऱ्यांमध्ये चांगला उत्साह दिसून आला.
तर स्वामिदीन पाल या मजुराने सांगितले की, हा क्षण कुठल्याही स्वप्नापेक्षा कमी नाही आहे. आज आमचा हिरा कोट्यवधी रुपयांमध्ये विकला गेला आहे. तो आम्हाला खूप मेहनतीने मिळाला आहे. त्यांनी सांगितले की, आता जे पैसे मिळतील, त्यामधून आम्ही आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू. देवाच्या घरी वेळ आणि पण अंध:कार नाही आहे. मी आणि माझ्या कुटुंबाने खूप कष्टामध्ये आणि गरिबीत दिवस काढले आहेत. हा हिरा मला माझ्या शेतात मिळाला होता. त्यामुळे आता यातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग मी माझ्या मुलांसाठी घर आणि शेती खरेदी करण्यासाठी करेन, असेही ते म्हणाले.