कोल्हापूर - पाचपैकी चार मोठ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होऊन भाजपने बाजी मारली तरी काँग्रेसने ९ लाख ४० हजार मते अधिक मिळवून आघाडी घेतली आहे. भाजपने सर्वाधिक आठ टक्के मते मध्य प्रदेशात घेतली आहेत, तर काँग्रेसने भाजपच्या तुलनेत तेलंगणामध्ये २५ टक्के अधिक मते मिळविली आहेत.
मिझोरामची निवडणूक स्थानिक पक्षात होती. भाजप आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटचा पराभव होऊन स्थानिक पक्ष असलेल्या झोरोमा पक्षाला बहुमत मिळाले आहे. या राज्यात भाजप दोन तर काँग्रेसला एकाच मतदारसंघात विजय मिळाला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपने ऐंशी टक्क्यांहून अधिक मते घेत कोणत्याही स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षांना जवळ केलेले नाही.
राजस्थानात फक्त साडेआठ लाख मतांनी मागे, फटका ३९ जागांवर
राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळाले, त्या पक्षाला १ कोटी ६५ लाख २३ हजार ५६८ मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला १ कोटी ५६ लाख ६६ हजार ५३१ मते मिळाली आहेत. जागा मात्र भाजपने ११५ जिंकल्या. काँग्रेसला ६९ मिळाल्या. कमी मतांच्या फरकाने जिंकणारे भाजपचे उमेदवार जास्त आहेत.
चार राज्यांत भाजपची एकूण मते कमीचचार राज्यांत काँग्रेसला एकूण ४ कोटी ९० लाख, ६९ हजार ४६२ मते मिळाली आहेत. भाजपला ४ कोटी ८१ लाख २९ हजार ३२५ मतदान झाले आहे. भाजपपेक्षा काँग्रेसला ९ लाख ४० हजार १३७ मते अधिक मिळाली आहेत. काँग्रेसच्या तेलंगणातील विजयाचा यात मोठा वाटा असला तरी इतर तीन राज्यांतील टक्केवारीत काटा लढत झाली आहे.
मध्य प्रदेशात ८, छत्तीसगडमध्ये ४ टक्क्यांचा निर्णायक फरकमध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत आठ टक्क्यांचा फरक आहे. भाजपला ४८.५५ टक्के तर काँग्रेसला ४०.४० टक्के मते मिळाली आहेत. राजस्थानात ४१.६९ टक्के मते भाजपने घेतली तर काँग्रेसला केवळ दोनच टक्के मते कमी मिळाली. काँग्रेसला ३९.५३ टक्के मते मिळाली आहेत. छत्तीसगडमध्ये हा फरक चार टक्क्यांचा आहे. भाजपला ४६.२८ तर काँग्रेसला ४२.२३ टक्के मते मिळाली आहेत. तेलंगणाच्या जोरावर काँग्रेसच्या एकूण मतांमध्ये मोठे अंतर पडले आहे. तेलंगणामध्ये बहुमत मिळविताना काँग्रेसने ३०.४० टक्के तर भाजपला तुलनेत १३.३० टक्के मते मिळाली आहेत.