साबरकांठा : गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील रहिवासी असलेले व्यापारी भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नीने २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले ऐशोआरामाचे जीवन सोडून जैन धर्माची दीक्षा घेण्याचे आणि एकांताचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश हे इमारत बांधकामाच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. साबरकांठा ते अहमदाबादपर्यंत त्यांचा व्यवसाय पसरला आहे. संन्यास घेतल्याने त्यांची चर्चा होत आहे.
भावेश भाई भंडारी यांनी आपले ऐशोआरामाचे जीवन सोडून जैन धर्माची दीक्षा घेण्याचे आणि एकांताचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीसह ३५ जण २२ एप्रिल रोजी हिम्मतनगर रिव्हर फ्रंट येथे एकांताचे जीवन जगण्याची शपथ घेणार आहेत.
४ किलोमीटर मिरवणूकभावेश भाई भंडारी व त्यांच्या पत्नीची हिंमतनगर येथे मोठ्या थाटामाटात ४ किलाेमीटर मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत भावेश भाईंनी त्यांची २०० कोटींची संपत्ती दान केली.
मुले आधीच संन्यस्तभावेश यांचा मुलगा आणि मुलगीही संन्यस्त जीवन जगत आहेत. १६ वर्षांचा मुलगा आणि १९ वर्षांच्या मुलीने दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली होती. मुलांपासून प्रेरणा घेऊन भावेश भाईंनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पंखे, एसी, मोबाइल फोन त्यागणार भंडारी यांच्या कुटुंबाचा नेहमीच जैन समाजाकडे कल असल्याचे लोकांनी सांगितले. त्यांचे कुटुंबीय अनेकदा दीक्षार्थीं आणि गुरूंची भेट घेत असे. संन्यास घेतल्यानंतर भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीला आयुष्यभर भिक्षा मागून जगावे लागणार आहे. पंखे, एसी, मोबाईल फोन यांसारख्या चैनीच्या वस्तूही त्यांना सोडून द्याव्या लागतील. याशिवाय त्यांना सर्वत्र पायी प्रवास करावा लागणार आहे.