जैसलमेर - राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी एका विमानाचा अपघात झाला. जैसलमेरच्या वाळवंटी भागात हा अपघात झाला असून अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. क्रॅश झालेले विमान पोखरणमध्ये सुरू असलेल्या 'भारत शक्ती' या तिन्ही सैन्य दलाच्या सरावात सहभागी तेजस असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, विमानाच्या ओळखीबाबत साशंकता आहे. हवाई दलाकडूनही याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
वसतिगृहावर विमान पडले, इमारत उद्ध्वस्त मात्र जीवितहानी नाही
हे लढाऊ विमान जैसलमेर शहराजवळील भिल्ल समाजाच्या वसतिगृहावर पडले आहे. खाली पडल्यानंतर आग लागली. हे फायटर प्लेन सुमारे तासभर धगधगत राहिले. दुर्घटनाग्रस्त फायटर प्लेनमध्ये दोन पायलट होते ज्यांनी फायटर प्लेन क्रॅश होण्यापूर्वी पॅराशूटच्या मदतीने खाली उडी मारली होती. सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. एकीकडे जैसलमेरपासून १०० किमी अंतरावर असलेल्या पोखरण फायरिंग रेंजमध्ये तिन्ही सैन्याकडून युद्ध सराव सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत. दुसरीकडे, हे लढाऊ विमान जैसलमेर शहराजवळ कोसळले.
'भारत शक्ती' महासरावात दिसणार ताकद
राजस्थानमधील पोखरणच्या वाळवंट परिसरात मंगळवारी दुपारी 'भारत शक्ती' या महासरावाला सुरुवात झाली. या अंतर्गत तिन्ही सैन्याच्या स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपकरणांचे सामर्थ्य दाखवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या 'भारत शक्ती' सरावाचे निरीक्षण केले. सुमारे ५० मिनिटे स्वदेशी संरक्षण क्षमतेचे समन्वित प्रदर्शन होते. यावेळी देशातील सर्वोच्च लष्करी अधिकारीही उपस्थित होते.