एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे बोलले जाते. इतिहासाच्या अनेक पानांमध्येही हे वाक्य आपण वाचलं असेल. राजेशाही असलेल्या भारतात राजा महाराजांकडे अमाप सुवर्णसंपत्ती होती. त्यामुळेच, प्राचीन भारत हा समुद्ध आणि संपन्न होता. देशातील या तत्कालीन गर्भश्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे जगतशेठ हे होते. जगतशेठ यांच्याकडे एवढा पैसा होता की, ते देशातीलच नाही, तर भारतात आलेल्या इंग्रजांनीही उधारीवर पैसे देत होते. जगतशेठ यांचे खरे नाव फतेहचंद असे होते.
मुघल बादशहा १७२३ मध्ये त्यांस जगतशेठ अशी पदवी दिली होती. त्यामुळे, संपूर्ण घराणंच जगत शेठ नावाने प्रसिद्ध झालं. शेठ माणिकचंद यांना या घराण्याचा संस्थापक मानले जात. माणिकचंद हे नवाब मुर्शिद कुली खाँ यांचे केवळ खजीनदार नव्हते, तर विभागातील शेतसाराही त्यांच्याकडे जमा होत होता. या दोघांनी मिळून बंगालची नवीन राजधानी मुर्शिदाबाद निर्माण केली. यांनी औरंगजेबाला एक कोटी ३० लाखांऐवजी २ कोटी रुपये लगान म्हणजे कर पाठवला होता.
माणिकचंद यांच्यानंतर फतेहचंदकडे कुटुंबाची जबाबदारी देण्यात आली होती. फतेहचंदच्या काळात त्यांचे कुटुंब एका विशिष्ट उंचीवर होते. सोने किंवा चांदीची भींत बांधून ते गंगा नदीचा प्रवाहही ते थांबवू शकतील, असं त्यांच्या कुटुंबाबद्दल तेव्हा बोललं जायचं. फतेहचंदच्या काळातच त्यांनी सर्वाधिक सोने-नाणे संपत्ती जमा केली. फतेहचंद यांच्या काळात या घराण्याची एकूण संपत्ती १००० बिलियन्स पाऊंड एवढी होती. १७२० च्या काळात जगतशेठच्या या एकूण संपत्तीपेक्षा इंग्रजांची अर्थव्यवस्थाही कमी होती. ब्रिटीश कागदपत्रांच्या दाखल्यानुसार जगतशेठ यांच्याकडे इंग्रजांच्या सर्वच बँकांपेक्षा अधिक संपत्ती होती.
जगतशेठ यांनी इंग्रजांना मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ केलं होतं. मात्र, ईस्ट इंडिया कंपनीकडे जगतशेठचं काहीही कर्ज नाही, असा दावा इंग्रजांनी केला. इंग्रजांनी जगतशेठला धोका दिला. मात्र, १९१२ पर्यंत इंग्रजांकडून जगतशेठ यांच्या कुटुंबीयांना जगतशेठ या उपाधीसह काही रक्कम पेन्शनस्वरुपात देण्यात येत होती. मात्र, कालानंतर ही पेन्शनही बंद करण्यात आली.