नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील ग्वालियमध्ये हत्या आणि आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीला आपल्या दुकानात बोलावून तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर मंदिरात स्वतःवर गोळी झाडून घेतली. यात विवाहित प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियकराचा 24 तासांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला. हत्या आणि आत्महत्येची ही घटना ग्वालियरच्या भितरवार पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनगड गावात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरूणाचे आई-वडील, भाऊ आणि काकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शनिवारी घडली. मोहनगड येथे माहेरी आलेल्या मालती चौहान या विवाहित महिलेची तिच्या शेजारी राहणाऱ्या पवन राणा या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केली. गोळी लागल्याने मालतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पवनने मंदिरात जाऊन स्वतःवर गोळी झाडली. रक्तबंबाळ झालेल्या मालतीला भितरवार रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी झालेल्या पवनला भितरवार येथून उपचारासाठी ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 24 तासांनंतर पवनचाही मृत्यू झाला.
महिलेच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बंदुक जप्त केली. मृत महिला मालतीचा भाऊ हरिओमने सांगितले की, मृत आरोपी पवनची आई वंदनाने त्याची बहिण मालतीला आपल्या घरी बोलावले होते. तिथे पवनसह सर्व लोकांनी मिळून मालतीची हत्या केली. मालतीचा भाऊ हरिओमच्या माहितीवरून भितरवार पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला. मालतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पवन राणाचे वडील भूपेंद्र राणा, आई वंदना राणा, भाऊ उपेंद्र राणा आणि काका उमराव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.
5 जणांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयराज कुबेर यांनी सांगितले की, मालती आणि पवन दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. माहितीतून स्पष्ट झाले की, पवनने मालतीला सर्वप्रथम गोळी मारली नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मालतीच्या कुटुंबीयांच्या आरोपांनंतर पवनसह 5 जणांवर 302चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, रविवारी आरोपी पवनचा देखील मृत्यू झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"