गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील कांडला येथील एका केमिकल फॅक्टरीमध्ये विषारी वायू गळतीमुळे पाच कर्मचाऱ्यांचा मृ्त्यू झाला आहे. या फॅक्टरीमध्ये केमिकलची टाकी साफ करत असताना हा अपघात झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी झाली असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
मिळालेली माहिती अशी, येथील इमामी ॲग्रो प्लांटमध्ये एका सुपरवायझरसह पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. केमिकल टाकी साफ करत असताना हा अपघात झाला. कारखान्यातील रासायनिक टाक्या साफ करताना विषारी धुराच्या संपर्कात आल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृतांपैकी चार मजूर आहेत, तर एक पाटण जिल्ह्यातील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी ते तेलाची टाकी साफ करत असताना हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
गुजरातमधील कांडला येथील इमामी ॲग्रोटेक प्लांटमध्ये खाद्यतेल, बायोडिझेल, रिफाइंड पाम, सोयाबीन तेल आणि वनस्पति तूप याचे उत्पादन केले जाते. याची उत्पादन क्षमता प्रतिदिन ३,२०० टन आहे. कच्छचे पोलिस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता ॲग्रोटेक प्लांटमध्ये ही घटना घडली. अपघाताच्या वेळी कामगार साफसफाई करत होते.
मिळालेली माहिती अशी, एक कर्मचारी गाळ काढण्यासाठी टाकीत उतरला होता यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला वाचवण्यासाठी अन्य दोन कर्मचारी टाकीत उटरले तेव्हा तेही बेशुद्ध पडले. यानंतर आणखी दोन कर्मचारी त्यात उटरले यात पाचही जणांचा मृत्यू झाला. सिद्धार्थ तिवारी, अजमत खान, आशिष गुप्ता, आशिष कुमार आणि संजय ठाकूर अशी मृतांची नावे आहेत.
इमामी ॲग्रोटेक लिमिटेडचे प्लांट हेड मणिक पाल यांनी सांगितले की, रात्री १२.३० च्या सुमारास काही लोक टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यांना वाचवताना चार जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. तपास सुरू आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
कारखान्यात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. तेथे पाचही जणांना मृत घोषित करण्यात आले.