आपण रस्त्यांवरून जाताना अनेकवेळा नंबर प्लेटसोबत छेडछाड केलेली वाहने बघितली असतील. खरे तर, नंबर प्लेटसोबत छेडछाड करणे, हा कायद्याने गुन्हा आहे आणि अशा स्थितीत कुणी पकडले गेले तर त्याला दंड भरावा लागतो. काहीसा असाच प्रकार, उत्तराखंडमध्येही घडला आहे, याचा फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. उत्तराखंडपोलिसांनी नुकताच, नंबर प्लेटवर 'पापा' लिहिलेल्या एका कारला दंड ठोठावला आहे. एवढेच नाही, तर पोलीस विभागाने नंबर प्लेटचा आधीचा आणि नंतरचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे.
एक व्यक्ती लोकांना रुबाब दाखविण्यासाठी आपल्या कारच्या नंबर प्लेटचा चुकीचा वापर करत आहे, अशी तक्रार ट्विटरच्या माध्यमाने पोलिसांना मिळाली होती. यानंतर तपास केला असता, संबंधित व्यक्तीच्या कारचा नंबर 4141 असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्यक्तीने कलाकारी करत नंबर प्लेटवर 4141 ला 'पापा' असे लिहिले होते.
यानंतर पोलिसांनी या व्यक्तीशी तत्काळ संपर्क साधला आणि त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. येथे पोहोचल्यानंतर, पोलिसांनी त्याला केवळ दडच ठोठावला नाही, तर त्याची नंबर प्लेटही बदलली. तसेच, यानंतर पुन्हा अशी चूक करू नका, असेही पोलिसांनी या व्यक्तीला बजावले आहे. संबंधित व्यक्तीच्या गाडीची नंबर प्लेट बदलल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी एक गमतीशीर ट्विटही केले आहे. तसेच, लोकांना अशी चूक करू नका असा मेसेजही दिला आहे.
उत्तराखंड पोलिसांनी केलेल्या या कारवाईच लोक सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.