बंगळुरू : पृथ्वीवरील जमीन तसेच बर्फाने व्यापलेल्या भूभागाचे दर १२ दिवसांनी सर्वेक्षण व नकाशे तयार करण्यासाठी नासा व इस्रो संयुक्त प्रकल्प हाती घेणार आहेत. नासा-इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार (निसार) असे नाव असलेल्या प्रकल्पासाठी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत काही चाचण्या करण्यात येतील. निसार हा तीन वर्षांचा प्रकल्प असून नासातर्फे निसार प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे फिल बरेला यांनी सांगितले की, निसार प्रकल्पाला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सुरुवात होईल. २०२४ च्या सुरुवातीला चाचण्या घेण्यात येतील.
अनेक चाचण्या होणार
निसार प्रकल्पासाठी अनेक महत्त्वाच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत. ते काम पुढील वर्षी हाती घेण्यात येईल. बॅटरी व स्टिम्युलेशन चाचण्या यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर निसार प्रकल्पाला आणखी चांगला आकार येणार आहे.
पृथ्वीवरील बदलांची नोंद
पृथ्वीवर विविध कारणांमुळे काही बदल घडत असतात. त्यांची व्यवस्थित नोंद घेणे, बदलांमागील अचूक कारण शोधणे या गोष्टी शक्य होतील. तसेच जगाचे नकाशे तयार करण्याऱ्या यंत्रणांची निसार प्रकल्पामुळे क्षमता वाढेल, असे नासा जेट प्रॉप्युल्शन लॅबोरेटरीच्या संचालक डॉ. लॉरी लेशिन यांनी सांगितले.