विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील मासेमारी बंदरात (Fishing Harbour) बोटींना भीषण आग (Massive Fire) लागल्याची घटना घडली. सुरुवातीला एका बोटीला लागलेली आग अखेर 40 बोटींमध्ये पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
विशाखापट्टणमच्या फिश पोर्टला लागलेली आग मध्यरात्री सुमारे 40 फायबर-यंत्रीकृत बोटींमध्ये पसरली. पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने कारवाई केली. आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे डीसीपी आनंद रेड्डी यांनी सांगितले.
काही गुन्हेगारांनी बोटींना आग लावल्याचा संशय मच्छिमारांना आहे. एका बोटीत पार्टी झाल्यामुळे ही आग लागल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. बंदरातील धक्कादायक दृश्यांमध्ये अग्निशामक दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. उदरनिर्वाहाचे साधन उद्ध्वस्त झाल्याने मच्छीमार असहाय्यपणे आग पाहत होते. काही बोटींमध्ये स्फोटही झाले, हे स्पष्टपणे इंधन टाक्यांपर्यंत पोहोचल्यामुळे आग लागली. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.
डीसीपी आनंद रेड्डी यांनी सांगितले की, आग रात्री साडेअकराच्या सुमारास लागली. बोटीवरील सिलिंडरमुळे स्फोट होऊ शकतो, त्यामुळे आम्ही लोकांना दूर राहण्यास सांगितले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. तर येथील एका मच्छिमारांनी सांगितले की, आगीमुळे सुमारे 40 मासेमारी नौका जळून खाक झाल्या आहेत. प्रत्येक बोटीची किंमत किमान 40 लाख रुपये होती.