हरियाणातील गुरुग्राम येथील सेक्टर ५७ मध्ये एका कुटुंबातील सदस्यांनी घरकाम करणाऱ्या १३ वर्षीय मुलीला कथितपणे हातोडीने मारहाण केल्याचा, कुत्र्यांना चावायला लावल्याचा आणि नंतर तिला कपडे उतरवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शनिवारी या प्रकाराची माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार ही मुलगी ज्या घरात काम करत होती. त्या कुटुंबातील महिला या मुलीला लोखंडी रॉड आणि हातोडीने मारहाण करत असे. तसेच तिच्या दोन मुलांनी या मुलीला विवस्त्र करून तिचा व्हिडीओ काढला. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला. आरोपी कुटुंबाने या पीडित मुलीला बंधक बनवून ठेवले होते. पीडितेच्या आईने अखेर शुक्रवारी तिची सुटका केली.
पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या आईने तिच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तिच्या मुलीला दर दोन दिवसांनी केवळ एकदा भोजन दिले जात असे. तसेच तिने आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडावर टेप लावण्यात येत असे.
सेक्टर ५१ मधील महिला पोलीस ठाण्यामध्ये नोंवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मुलीला कामावर ठेवणारे कुटुंब तिच्या हातांवर अॅसिड टाकायचे. तसेच कुणालाही याबाबत सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी द्यायचे. दरम्यान, आता पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आगे. पोलिसांनी सांगितले की. आरोपी कुटुंबाच्या तीन सदस्यांवर पॉस्कोच्या कलम १० आणि किशोर न्याय अधिनियममधील कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.