नवी दिल्ली : पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतरही मनमोहन सिंग यांच्यातील साधेपणा कायम होता. त्यांनी आम्हाला चहापानासाठी सफदरजंग लेनमधील निवासस्थानी बोलाविले. त्यांनी घरातील नोकरांना न सांगता आमच्यासाठी स्वत: चहा आणला अशी आठवण पंतप्रधानाच्या वैद्यकीय पथकाचे तत्कालीन प्रमुख डॉ. श्रीधर रेड्डी यांनी सांगितले. डाॅ. मनमोहन सिंग हे सौजन्यमूर्ती तसेच आज्ञाधारक रुग्णदेखील होते असे वर्णन रेड्डी यांनी केले आहे.
डॉ. श्रीधर रेड्डी हे दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या कार्डिऑलॉजी विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत. त्यांनी सांगितले की, २००४ सालापासून माझा डाॅ. मनमोहन सिंग यांच्याशी परिचय झाला. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचे ते काटेकोर पालन करत. ते आज्ञाधारक रुग्ण होते.
विदेशाऐवजी भारतातच करून घेतली शस्त्रक्रियाडॉ. श्रीधर रेड्डी यांनी सांगितले की, त्यांच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ते आम्हाला सोडायला कारपर्यंत येत असत. पंतप्रधानासारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊनही त्यांची साधी राहणी कायम होती. २००९ साली डाॅ. सिंग यांच्यावर दुसऱ्यांदा बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी हे वैद्यकीय उपचार परदेशाऐवजी भारतातच घेणे पसंत केले. याआधी त्यांच्यावर लंडनमध्ये १९९० साली बायपास शस्त्रक्रिया झाली होती.