सासू कधीच आपल्या सुनेवर आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही असं नेहमी म्हटलं जातं. तसेच तिला आपल्या मुलीचा दर्जा देऊ शकत नाही असंही बोललं जातं. पण भोपाळमधील एका सासूनं आपल्या सुनेला पाठिंबा देऊन या सर्व गोष्टी चुकीच्या असल्याचं सिद्ध केलं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं महत्त्वाचं हे दाखवून दिलं आहे. शहरातील कोलार परिसरात राहणाऱ्या एका महिलेला लग्नाला १० वर्षे उलटूनही मूल झालं नाही. इतके वर्ष मूल न झाल्यानं महिलेचा पती तिच्यावर संशय घेऊ लागला होता.
आपलाच मुलगा सुनेवर संशय घेत असल्याचं पाहून सासूला राहावलं गेलं नाही. सासूने विरोध केला असता मुलगा आपल्याच आईला शिवीगाळ करू लागला. मुलाच्या वागण्याने व्यथित झालेल्या आईनं त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठलं. गुरुवारी दुपारी सुनेसह आई मुलाविरुद्ध तक्रार देण्यासाठी कोलार पोलिस ठाण्यात पोहोचली.
पतीच्या छळाला कंटाळून घटस्फोट घेतलालग्नाला 10 वर्षे झाली तरी सुनेला मूल होत नाही. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलामध्ये कमतरता होती. पण आता तोच माझ्या सुनेवर संशय घेत आहे. तिला छळत आहे, अशी तक्रार वृद्ध सासूनं पोलिसात केली आहे. या वृद्ध महिलेचे वय ७३ असून त्यांनी आपल्याच मुलाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पतीच्या जाचाला वैतागून महिलेने काही काळापूर्वीच पतीपासून घटस्फोट घेतला होता.
सुनेचं भलं व्हावं हिच इच्छामी माझ्या मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आली आहे, पाणावलेल्या डोळ्यांनी वृद्ध महिला पोलिसांसमोर आपली भावना व्यक्त करत होती. मला माझ्या सुनेला चांगले आयुष्य जगताना पाहायचे आहे. माझा मुलगा सुनेवर संशय घेतो, पण माझा सुनेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या सुनेला आई-वडील नाहीत. तिला इंदूरच्या एका पुजार्यानं दत्तक घेतलं होतं, अशी माहिती सासूनं पोलिसांना दिली.
याच पुजाऱ्यांनी आपल्या मुलासाठी तिचं स्थळ सुचवलं होतं. दोघंही इंदूरमधील एकाच रुग्णालयात काम करायचे. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. सून काही महिन्यांसाठी माझ्याकडे भोपाळला आली होती. मी सुनेलाही साथ दिली, असं सासूनं सांगितलं.
सुनेच्या बाजूनं बोललं की शिवीगाळ करायचा मुलगालग्नाला १० वर्षे उलटूनही मुलगा आणि सुनेला मूल झाले नाही. खूप उपचार केल्यावर कळलं की ही कमतरता सुनेमध्ये नसून मुलामध्ये आहे. तरीही मुलाने आपला राग सुनेवर काढण्यास सुरुवात केली. तो सुनेवर संशय घेतो. मी त्याला साथ दिली तर तो मला शिव्या देतो, असंही वृद्ध सासूनं पोलिसांना सांगितलं. काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही. माझ्या मुलीसारख्या सुनेला मी आधार देईन. मला सूनेसोबतच राहायचं आहे, पण मला माझ्या मुलाला घराबाहेर काढायचं आहे, असंही त्या म्हणाल्या. या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.