मिर्झापूर : आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या मातेची कहाणी सर्वांनाचा भावूक करणारी आहे. या माऊलीने व्याजावर पैसे घेतले, दागिने विकले. मात्र एवढं करूनही उपचारासाठी आणखी पैसे लागतील म्हणून शेवटी तिने घरही गहाण ठेवले. शेवटी या मातेने आपल्या आजारी मुलासाठी आतोनात प्रयत्न करणे सुरूच ठेवले. मात्र, आजारपणाने त्रस्त असलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी गंगेत फेकून मारण्याचा प्रयत्न केला. पण, आईने मुलाच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यामुळे आता तो हळूहळू बरा होत आहे. या आईच्या चेहऱ्यावर हसू परत येत आहे.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील उस्का गावातील सुमन या माऊलीला मुलगा झाला तेव्हा घरात आनंदाला थारा नव्हता. मुलाचे नाव शौर्य असे ठेवण्यात आले. शौर्य यांच्या हसण्या-खेळण्यामुळे त्यांच्या छोट्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शौर्यचा जन्म त्याच्या आई-वडिलांसाठी आशीर्वादच होता. पण लवकरच त्यांचा चार महिन्यांचा मुलगा शौर्य आजारी पडल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. पण त्याच्या आईने खचून न जाता 'शौर्य' दाखवले.
शौर्यच्या आईने सांगितली आपबीती शौर्यची आई सुमन यांनी सांगितले की, शौर्य आजारी पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी जिकडे सांगितले तिथे मुलाला दाखवले. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा लोक म्हणाले की, भूतांचा त्रास आहे, त्यामुळे मुलगा आजारी राहतोय आणि औषधही काम करत नाही. त्यामुळेच सुमन यांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याला बाजूच्या बाबांकडे नेले. त्यांनी 15 हजार रुपये घेतले, पण मुलाला आराम पडला नाही. त्यानंतर त्यांनी मिर्झापूरपासून बनारसपर्यंत अनेक खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या, पण शौर्य कुठेही बरा झाला नाही. यादरम्यान उपचारासाठी चार लाखांहून अधिक रुपये खर्च झाले.
शौर्यच्या वडिलांचा राक्षसी अवतार शौर्यच्या आईने सांगितले की, डॉक्टरांनी सांगितले की त्याला टीबी झाला आहे. सहा महिने औषध घेतले. पण, आराम मिळत नव्हता. त्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी दाखवले असता डॉक्टरांनी सांगितले की, त्याची पचनसंस्था बिघडली आहे, त्याला आता वाचवता येणार नाही. निराश होऊन आम्ही मुलाला घेऊन घरी आलो. तेव्हा कोणत्याही प्रकारची आशा नव्हती. दरम्यान, अंगणवाडीतील एक शिक्षिका आली आणि त्यांनी सर्कल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाण्यास सांगितले. शौर्यबरोबर आम्ही तिथे गेलो. त्याची अवस्था बघून त्याच्या वडिलांचे कंबरडे मोडले. तो जगणार नाही, गंगेत फेकून घरी परत जा, असे त्यांनी मला सांगितले. यावर मी म्हणाले, जोपर्यंत त्याचा श्वास आहे तोपर्यंत मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही. 20 दिवसांनी दाखल झाल्यानंतर शौर्यच्या प्रकृतीत सुधारणा झाली. औषध चालू आहे, आता त्याला आराम मिळत आहे, असे शौर्यच्या आईने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"