उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे आज सकाळी एक महिला आणि एका तरुणाचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली आहे. सदर महिला आणि तरुणामध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. तसेत दोघांनाही विवाह करायचा होता. मात्र समाजातील लोक विरोध करत असल्याने त्यांचा विवाह होत नव्हता. त्यामुळेच वैतागून या दोघांनीही जीवन संपवलं, असं सांहण्यात येत आहे.
पोलिसांनी याबाबत अधिका माहिती देताना सांगितले की, बुलंदशहर जिल्ह्यातील काकोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिघेपूर नावाच्या गावातील सपना (३५) आणि मनीष (२५) या दोघांनी जीवन संपवलं. सपना ही महिला विवाहित होती. मात्र तिचं पतीसोबत पटत नव्हतं. त्यामुळे मागच्या दीड वर्षापासून या महिलेचा पती तिच्यापासून वेगळा राहत होता. याचदरम्यान, या महिलेची गावातील मनीष नावाच्या तरुणासोबत जवळीक वाढली. तसेच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंधांना सुरुवात झाली.
त्यानंतर दोघेही गावामध्ये एकत्रपणे फिरताना दिसायचे. तसेच या दोघांनाही पती-पत्नीप्रमाणे जीवन जगायचे होते. मात्र गाव आणि समाजाच्या भीतीमुळे ते लग्न करू शकत नव्हते. याचदरम्यान, मंगळवारी सकाळी दोघेही बीघेपूर गावामधील शेतात पोहोचले. तसेच तिथे असलेल्या आंब्याच्या झाडाला लटकून त्यांनी जीवन संपवले. आजूबाजूला काम करत असलेल्या लोकांनी आंब्याच्या झाडाला लटकलेले मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपासास सुरुवात केली आहे.