लवकरच चित्त्यांची नवी खेप येणार; मध्य प्रदेश अन् राजस्थानच्या अभयारण्यात ठेवले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 09:46 PM2024-07-15T21:46:39+5:302024-07-15T21:47:13+5:30
ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत केनियातील चित्ते भारतात दाखल होतील.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी चित्ता प्रकल्पाला सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. चित्त्यांच्या मृत्यूमुळे या प्रकल्पाचे पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आता परिस्थिती सुधारली आहे. चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबले असून, त्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळेच आता या प्रकल्पांतर्गत आफ्रिकन देशांतून चित्त्यांची नवी खेप आणण्याची तयारी सुरू झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत आणखी काही चित्ते भारतात येतील.
आतापर्यंत 20 चित्ते भारतात आले
चित्ता प्रकल्प 2022 मध्ये सुरू झाला, त्याअंतर्गत येत्या पाच वर्षांत एकूण 50 बिबट्या आणले जाणार आहेत. यातील आठ चित्ते 2022 मध्ये नामिबियातून आणण्यात आले होते, तर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले. आतापर्यंत एकूण 20 चित्ते भारतात आले, त्यापैकी सात चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या 13 चित्ते भारतात असून, त्यातील काहींनी पिलांनाही जन्म दिला आहे. या सर्वांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह इतर वन्यजीव तज्ञही आनंदीत आहेत.
आता केनियाहून चित्ते येणार
सध्या कुनोमध्ये चित्त्यांची एकूण संख्या 27 आहे, ज्यात 13 प्रौढ आणि 14 शावकांचा समावेश आहे. यातील सुमारे सहा शावकं एक वर्षाची होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही वन्यजीवांचे पुनर्वसन किंवा विकास होण्यासाठी त्यांची संख्या शंभरच्या आसपास असावी. मिळालेल्या माहितीनुसार, आता केनियाहून चित्ते आणले जाणार आहे. केनियाचे हवामान काहीसे भारतीय वन्यजीव अभयारण्यांसारखे आहे.
मध्य प्रदेश-राजस्थानच्या अभयारण्यांमध्ये चित्ते ठेवले जाणार
सध्या मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात चित्ते ठेवले आहेत. पण, कुनोची एकूण 25-30 बिबट्या ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता नवीन चित्ते दुसऱ्या कुठल्यातरी अभयारण्यात ठेवली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, चित्त्यांची नवीन खेप मध्य प्रदेशातील नोरादेही आणि गांधी सागर किंवा राजस्थानमधील भैंसरोदगड येथे ठेवली जाऊ शकतात. याचे कारण म्हणजे, कुनोमध्ये ठेवलेले चित्ते राजस्थानला लागून असलेल्या अभयारण्यातही फिरत आहेत.