- पवन देशपांडे
आपली सुटी आहे आणि त्या दिवशीही जर आपल्या कोणत्या सहकाऱ्याने किंवा बॉसने फोन करून, मेसेज करून किंवा मेल करून काम सांगितले तर?.. वैताग वैताग आणि वैताग... याशिवाय काहीच नाही.
कोरोनामुळे जगात कामांच्या तासांचे आणि स्वरूपाचे सर्व ठोकताळेच बदलले आहेत. कोरोना काळाच्या आधी सारेच कसे कार्यालयीन वेळेत जेवढे काम शक्य आहे तेवढे पूर्ण करायचे. उर्वरित काम सुटीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये जाऊनच व्हायचे. पण गेल्या दोन वर्षांत वर्क फ्रॉम होमचा जो ट्रेंड आलाय त्याने २४ बाय ७ अशी कामाची व्याख्या झाली आहे. म्हणजे तुम्ही घरून काम करत असाल तर केव्हाही तुम्ही कामासाठी उपलब्ध असायला हवे, असा ट्रेंड रुजायला सुरुवात झाली.
कंपन्यांनाही हे फावले. कारण कर्मचारी घरून काम करणार म्हणजे ऑफिसचा इतर खर्च आपोआपच कमी झाला. त्यातून मग कोरोना गेला तरी आणि लॉकडाउन संपले तरी वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड कायम आहे. ३० ते ४० टक्के कर्मचारी हल्ली घरूनच काम करत आहेत. त्यामुळे ते कधीही केव्हाही उपलब्ध असतील असा एक समज निर्माण झाला आहे. बरं घरून आणि हवे त्या ठिकाणाहून काम करता येत असल्याने कर्मचारीही फारसे त्याविरोधात आवाज उठवायच्या भानगडीत पडत नाहीत. पडल्याचे दिसलेही नाही. न्यू नॉर्मलने दिलेल्या या देणगीत आणखी एका नव्या नियमाची भर पडू पाहात आहे. ती म्हणजे सुटीच्या दिवशी त्रास द्यायचा नाही.
भारतातील ‘ड्रीम इलेव्हन’ या कंपनीने नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. सुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यास कामावर असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीने संपर्क करायचा नाही. केल्यास १ लाख रुपयांचा दंड केला जाईल, असा इशाराही कंपनीने दिला आहे. ‘ड्रीम इलेव्हन अनप्लग’ असे या योजनेचे नाव आहे. कंपनीचे सीईओ हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी याविषयी लिंक्ड इन या सोशल मीडिया साइटवर सविस्तर पोस्टही केली आहे. त्यात ते म्हणतात, सुटीच्या दिवशी आपल्या कुटुंबाला वेळ देणे किंवा आराम करणे यामुळे एकूणच कामावर सकारात्मक परिणाम होत असतो. सुटी संपल्यानंतर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मूड चांगला राहतो, परिणामी अशा कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढते आणि अप्रत्यक्षपणे त्याचा कंपनीला फायदा होतो.
या निर्णयामागे आणखीही एक मोठा विचार आहे. एखादा कर्मचारी सुटीच्या दिवशीही नेहमी काम करत असेल तर काही काळानंतर त्याच्या मनात कंपनीबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. सुटीच्या दिवशीही काम करायचे तर मग सुटी देता तरी कशाला, असा विचारही सुरू होतो. त्यातून मग नव्या जॉबचा शोध सुरू होतो. चांगले टॅलेंट बाहेर पडायला सुरुवात होते. हे जर होऊ द्यायचे नसेल तर कंपन्यांना काही धोरण आखणं गरजेचं आहे. २०२३ हे वर्ष असेच नवनवे धोरण घेऊन येणारे ठरणार आहे. त्यातला हा पहिला ट्रेंड असू शकतो की, टॅलेंट टिकवून ठेवायचे असेल तर त्यांच्या हक्काच्या सुटीच्या काळात त्यांना डिस्टर्ब करू नये.
गेल्या वर्षी एका सोशल मीडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५४ टक्के लोक सुटीच्या दिवशीही कामापासून दूर राहू शकत नव्हते. पण यामुळे काही कर्मचारी नाराजही होत असल्याचे आढळले होते. अशा लोकांचा कंपनी बदलण्याचा कलही वाढू लागला होता. म्हणूनच आयटी सेक्टरमध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणात कंपन्या बदलत होते. हायब्रिड वर्क कल्चर हाही अशाच एका धोरणाचा भाग आहे. चांगले कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या आता आठवड्यातील एखादा दिवस वर्क फ्रॉम होमचीही परवानगी देत आहेत. २०२३ हे वर्ष अशा नवनव्या वर्क कल्चरच्या ट्रेंडने भरलेले असणार आहे. ‘अनप्लगिंग’ हा त्याचा पहिला भाग आहे.