मनोज भिवगडे, लोकमत न्यूज नेटवर्करांची : झारखंड राज्य निर्मितीपासून लोकसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चा या प्रादेशिक पक्षाने राज्यातील १० टक्के व्होट बँक टिकवून ठेवली, तर काँग्रेसच्या बाबतीत मात्र चढ-उतार बघावयास मिळाले. यावेळी चार टप्प्यांत येथे निवडणूक होत असून गुरुवार, १८ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला राज्यात सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात सिंहभूम, खुंटी, लोहारडग्गा आणि पलामू या जागांवर १३ मे रोजी मतदान होईल.
झारखंड निर्मितीनंतर २००४ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपाने येथे प्रभाव राखला. पहिल्या निवडणुकीत भाजपाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र, त्यावेळी भाजपाच्या पारड्यात मतदारांनी ३३.०१ टक्के मते टाकली होती. प्रादेशिक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने पहिल्या निवडणुकीपासूनच १० टक्के मतांचा वाटा कायम राखला. झाविमो प्रजातांत्रिक पक्षाने २००९मध्ये ‘झामुमो’सह राष्ट्रीय पक्षांपुढे आव्हान निर्माण करीत १० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविली हाेती.
भाजप-काँग्रेसला मिळालेली मतेझारखंडच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत २१.४४ टक्के मत मिळविणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील टक्केवारीत चढ-उतार बघावयास मिळाला. तर, २००९चा अपवाद वगळता भाजपच्या मतांमध्ये वाढ दिसून आली.
काँग्रेसची कामगिरी घसरली- पहिल्याच निवडणुकीत ६ जागा मिळाल्या होत्या. - २०१९च्या निवडणुकीत एका जागेवर समाधान मानावे लागले. - २००९ आणि २०१४मध्ये पाटी कोरी होती.
सहा जागांवर भाजपला चौथ्यांदा विजयाची अपेक्षा
- झारखंडमधील सहा जागांवर २००९पासून भाजपाचे उमेदवार सलग तीन वेळा विजयी झाले आहेत.
- यात गोड्डा, धनबाद, जमशेदपूर, हजारीबाग या मतदारसंघांसह अनुसूचित जमातीकरिता राखीव
- लोहरदगा आणि खुंटी या मतदारसंघांचा समावेश आहे.
- दुमका हा आणखी एक अनुसूचित जमातीकरिता राखीव मतदारसंघ २०१९च्या निवडणुकीत ‘झामुमो’च्या हातून निसटला होता. यावेळी भाजपकडून पुन्हा परत घेण्यासाठी सोरेन कुटुंबाने कंबर कसली आहे. मात्र, या ठिकाणी साेरेन कुटुंबामध्येच लढत आहे.