नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पारडे बदलून एनडीएमध्ये प्रवेश केल्याने बिहारच्या राजकारणातील समिकरणं पुन्हा बदलली आहेत. मात्र एनडीएकडे असलेलं काठावरचं संख्याबळ, आमदारांची नाराजी आणि लालू प्रसाद यादव यांच्याकडून होत असलेली मोर्चेबांधणी यामुळे १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये काय होणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. बहुमत चाचणी पूर्वी संभाव्य फूट टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या सर्ल आमदारांची निवास्थानी बैठक बोलावली. तसेच त्यांना तिथेच थांबण्याचे आदेश दिले. तर जेडीयूने बोलावलेल्या मेजवानीला त्यांच्याच पक्षातील पाच आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी विधानसभेत काय होणार याबाबतचा संभ्रम वाढला आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे जे आमदार तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांना तिथेच थांबावे लागले होते. त्यानंतर काही वेळातच आमदारांचं आवश्यक सामान तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले. तसेच बहुमत चाचणीपूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्याबाबतही पेच निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे २१ फेब्रुवारीपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. एकीकडे तेजस्वी यांनी बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिलेले असल्याने नेमकं काय होणार याबाबत तर्क लढवले जात आहेत.
दुसरीकडे नितीश कुमार आणि भाजपाकडूनही पुढील रणनीतीबाबत विचारमंथन सुरू आहे. आधी सर्व आमदारांना बिहारमध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर मंत्री श्रवण कुमार यांच्या निवास्थानी आमदारांना भोजनासाठी निमंत्रित करण्यात आले. तसेच भाजपाने आपल्या सर्व आमदारांना दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी बोधगया येथे बोलावले आहे. तसेच ११ फेब्रुवारीपर्यंत तिथेच थांबण्यास सांगण्यात आले.
मात्र श्रवण कुमार यांच्याकडून आयोजित भोजनाच्या मेजवानीला जेडीयूच्या पाच आमदारांनी दांडी मारली. आमदार बीमा भारती आणि सुदर्शन यांच्य अनुपस्थितीमागची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. या दोघांशिवाय शालिनी मिश्रा, दिलीप राय आणि संजीव सिंह हे पाटणा येथे उपस्थित नसल्याने मेजवानीला अनुपस्थित होते. दरम्यान, अनुपस्थित राहिलेल्या आमदारांशी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधला आहे. तर काँग्रेसचे १६ आमदार अद्यापही हैदराबादगमध्ये आहेत. हे आमदार आज बिहारमध्ये परतण्याची शक्यता आहे.