देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 7,830 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यादरम्यान 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. गेल्या 223 दिवसांत देशात नोंदवली गेलेली ही सर्वाधिक दैनंदिन रुग्ण संख्या आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला देशात 7,946 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, देशातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 40,215 वर पोहोचली आहे.
हे आहे कोरोनाचं नवं रूप -धक्कादायक गोष्ट म्हणजे, कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच ओमायक्रॉनच्या XBB1.16 या व्हेरिअंटमध्ये म्यूटेशन झाले आहे. यामुळे आता आणखी एक XBB1.16.1 हा व्हेरिअंट समोर आला आहे. आकडेवारीनुसार, दिल्ली, गुजरात आणि हरियाणासह एकूण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB1.16.1 आढळला आहे. भारतीय सार्स Cove-2 जिनोमिक्स कंसोर्टियमच्या (INSACOG) आकडेवारीनुसार, 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये XBB1.16 व्हेरिअंटचे 1,774 रुग्ण आढळून आले आहेत.
भारतीय सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्टियम विविध राष्ट्रीय प्रयोगशाळांचा एक समूह आहे. ज्याची स्थापना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केली आहे. आयएनएसएसीओजी कोरोना व्हायरसची जिनोम सिक्वेंसिंग आणि कोविड-19 व्हायरसचे विश्लेषण करत आहे. भारतात 80% हून अधिक रुग्णांना याच व्हेरिअंटची लागण झाली आहे. ICMR ने हा व्हेरिअँट आयसोलेट कररून टेस्ट केला. यानंतर लॅब स्टडीमध्ये जो परिणाम आला त्यानुसार, हा व्हेरिअँट घातक नाही. मात्र येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊ शकते. मात्र रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या नगन्य असेल.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आता घाबरण्याची गरज नसली तरी, लोकांनी सतर्क राहायला हवे. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करायला हवे. याशिवाय, आपण अद्याप कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतला नसेल, तर तोही घ्यायला हवा.