बंगळुरू - कर्नाटकात एका सरकारी रूग्णालयातील नर्सने केलेल्या कारनाम्याने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी उपचारासाठी आलेल्या ७ वर्षीय मुलाच्या जखमेवर टाके लावण्याऐवजी तिने फेव्हिक्विक लावली. नर्सने केलेला प्रकार समोर येताच तिला तात्काळ निलंबित करण्यात आले. हावेरी जिल्ह्यातील हंगलमधील अदुर प्राथमिक आरोग्य केंद्रावर ही घटना घडली. आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सध्या ज्या मुलाला फेव्हिक्विक लावण्यात आलं होतं त्याची प्रकृती ठीक आहे.
माहितीनुसार, ७ वर्षीय गुरूकिशन अन्नाप्पा होसमानी याच्या चेहऱ्यावर जखम होऊन रक्त येत होते. त्याच्या आई वडिलांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. उपचारावेळी नर्सने त्याच्या जखमेवर फेव्हिक्विक लावले, या घटनेचा आई वडिलांनी व्हिडिओ बनवला. या व्हिडिओत ती नर्स मी कित्येक वर्ष हेच करते, टाके लावल्यानं मुलाच्या चेहऱ्यावर खूण तशीच राहील त्यापेक्षा फेव्हिक्विक चांगले आहे असं ती बोलताना दिसते. त्यानंतर आई वडील नर्सची तक्रार करून संबंधित व्हिडिओ दाखवतात.
ही तक्रार आणि व्हिडिओ पाहूनही नर्स ज्योतीला निलंबित करण्याऐवजी तिची बदली करण्यात येते. त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष पसरला. त्यानंतर या घटनेची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाते. फेव्हिक्विक एक चिटकवण्यासाठी वापरण्यात आलेली वस्तू असते, तिचा वैद्यकीय उपचारासाठी वापर करणे नियमांविरोधात आहे. या प्रकारानंतर फेव्हिक्विकचा वापर करणाऱ्या संबंधित नर्सला प्राथमिक रिपोर्टनंतर तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. नियमानुसार पुढील चौकशी करण्यात येत आहे असं आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, ज्या मुलावर फेव्हिक्विकने उपचार करण्यात आले, त्याची प्रकृती चांगली आहे. त्याशिवाय आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पीडित मुलावर कुठलेही साईड इफेक्ट होऊ नयेत यासाठी खबरदारी घेत असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.