बंगळुरू : कर्नाटकात एका प्रचार रॅलीदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उघड्या वाहनात एक बंदूकधारी व्यक्ती त्यांच्याजवळ उभा असल्याचे व्हिडिओतून दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. या व्यक्तीने वाहनातील एका काँग्रेस नेत्याला पुष्पहारही घातला हा व्हिडीओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सुरक्षेत एवढी माेठी चूक कशी झाली, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांची मुलगी आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार सौम्या रेड्डी यांच्या प्रचारादरम्यान बंगळुरूमध्ये ही घटना घडली. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर पाेलिसांनी त्याच्याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांजवळ पाेहाेचलेल्या बंदूकधारी व्यक्तीचे नाव रियाझ असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने कंबरेला बंदूक लावली होती. रियाझ हा काही वर्षांपूर्वी एका हल्ल्यातून बचावला होता. त्यामुळे त्याला शस्त्र परत जमा करण्यापासून सूट देण्यात आली होती. त्याच्याकडे बंदुकीसाठी लागणारा परवाना आहे.