गुरुग्राम: पोलिसांना सामान्य नागरिकांचे मित्र म्हटले जाते. अडचणींच्या काळात पोलीस मदतीला येतात. पण, गुरुग्राममध्ये पोलिसह काळ बनून आले. पोलिसांच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स व्हेइकल(ERV) मुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं. फरिदाबादहून गुरुग्रामकडे चुकीच्या दिशेने येणाऱ्या ईआरव्ही वाहनाने एका स्विफ्ट वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर कारमधील दोन मुलांसह पाच जण जखमी झाले.
दिल्ली खेडा खुर्द येथील रहिवासी विश्वजीत यांनी सांगितले की, त्यांची पत्नी काजल, सासू बबिता, भावजय रिंकू, रिंकूचा मुलगा प्रियांक आणि विश्वजीतचा मुलगा अवि आणि सहा वर्षांची मुलगी सावी दिल्लीहून फरिदाबादला जात होते. रिंकू गाडी चालवत होती. सकाळी 11.15 च्या सुमारास त्यांची स्विफ्ट कार गुरुग्राम फरिदाबाद रस्त्यावरील घाटा ट्रॅफिक सिग्नलजवळ आली असता, चुकीच्या दिशेने येणाऱ्या पोलिस व्हॅनने थेट त्यांच्या कारला धडक दिली.
या घटनेत सावीचा मृत्यू झाला तर इतर सर्व जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर जखमींना मदत करण्याऐवजी पोलिसांनी घटनास्थळावरुन पळ काढला. गुरुग्रामचे एसीपी विकास कौशिक म्हणाले, "अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पीसीआर व्हॅन चालकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 337, 427, 304 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."