बंगळुरू - कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका गर्भवती महिलेकडे आधारकार्ड नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर या महिलेला रुग्णालयातून घरी जावे लागले. तिथे तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र तिची प्रकृती इतकी बिघडली की, त्या महिलेसह त्या दोन्ही नवजात मुलांचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे सरकारी व्यवस्थेच्या असंवेदनशील कारभाराची लक्तरे वेशीला टांगली गेली आहे. तसेच या प्रकारामुळे मानवतेला काळिमा फासला गेला आहे. ३० वर्षांच्या कस्तुरी या गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आणण्यात आले होते. मात्र या महिलेकडे मॅटर्निटी कार्ड आणि आधार कार्ड नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे ही महिला घरी माघारी गेली. त्यानंतर तिथेच तिची प्रसुती झाली. मात्र दुर्दैवाने गुरुवारी सकाळी ही महिला आणि तिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कस्तुरी हिला बुधवारी संध्याकाळी प्रसुतीकळा येण्यास सुरुवात झाली होती. तिला रिक्षामधून जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तिथे तिला दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे तिला घरी परतावे लागले. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिची प्रसुती झाली. मात्र डिलिव्हरीनंतर तिच्या पहिल्या मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी कस्तुरीचा मृत्यू झाला. तर दुसरं मुलही मृत जन्माला आलं.
हा प्रकार म्हणजे जिल्हा रुग्णालयाची असंवेदनशीलता आहे, असा आरोप स्थानिक करत आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी मॅटर्निटी कार्ड आणि आधारकार्ड आवश्यक कागदपत्रे आहेत. मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेता आले असते, असे लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यावेळी ड्युटीवर असलेले डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.