पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:08 PM2024-11-28T19:08:41+5:302024-11-28T19:09:17+5:30
"यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या..."
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात दिल्लीतमहायुतीतील काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री पदासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे 'मी काही ज्योतिष नाही', असे उत्तर दिले.
काय म्हणाले अजित दादा? -
अजित दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणखी पाच वर्षे वाटावे लागेल का? असा प्रश्न विचारला असता, "मी काही ज्योतिषी नाही. यासंदर्भात आज रात्री आमची चर्चा होईल. आम्ही देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचे लक्ष आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत, असे अजित पवार म्हणाले.
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाणार आहे का, असा काही फॉर्म्युला आहे का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, "अरे राज्याचे सरकार आहे. १३-१४ कोटी लोकांचे नेतृत्व करायचे आहे. आम्ही एका विचाराने पुढे चाललो आहोत. आमचे ध्येय राज्याचा सर्वांगीण विकास करणे आहे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याच बरोबर, पूर्वीच्या योजनां कशा व्यवस्थित चाललीत आणि आश्वासनांची पूर्तता कशी होईल? हे आमचे पहिले लक्ष आहे."
तुमच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळेल का? असे विचारले असता, "यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या," असे अजित पवार म्हणाले.