कामगारांच्या सुटकेसाठी अखेरचा अडथळा पार करणारे रिअल हिरो, दिलेल्या वेळेआधी मोहीम केली फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 06:47 AM2023-11-30T06:47:35+5:302023-11-30T06:48:43+5:30
Uttarkashi Tunnel Accident: सर्व मशिन्स ठप्प पडल्यानंतर अखेर बोगद्यातील राहिलेले काम हाताने खोदकाम करून काढण्याचे ठरले तेव्हा रॅट होल कामगार मदतीला आले.
सर्व मशिन्स ठप्प पडल्यानंतर अखेर बोगद्यातील राहिलेले काम हाताने खोदकाम करून काढण्याचे ठरले तेव्हा रॅट होल कामगार मदतीला आले. १२ जणांच्या या टीमकडे अतिशय कमी वेळ होता. त्यांनी २४ ते ३६ तासांमध्ये मलबा हटविण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी वेळेआधीच ढिगारा उपसत अडकलेल्या कामगारांपर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार केला. या मेहनतीच्या कामासाठी त्यांनी एकही रुपया घेतला नाही. ‘आम्हांला या ऐतिहासिक मोहिमेचा भाग झाल्याबद्दल आनंद आहे,’ असे या टीममधील सर्वजण सांगत होते.
आयुष्यातील पहिली आणि शेवटची संधी होती
- वकील हसन (रॅट मायनर्सच्या टीमचे सुपरव्हायजर)
देहरादूनचे अशोक सोळंकी यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितले की आपल्याला या कामगारांना बाहेर काढायचे आहे. सोळंकी यांच्यासाठी आम्ही दोन ते अडीच किमी रॅट मायनिंगचे काम केले आहे. आमच्यासमोर आयुष्यातील पहिली आणि शेवटची संधी होती की आम्ही स्वतःला सिद्ध करू शकू. ही संधी मला सोडायची नव्हती. आमचे काम कठीण आणि जोखमीचे आहे. आर्थिक जोखमीचेही आहे. पैसे मिळतात, कधी मिळत नाहीत. कामगारांची स्थिती बदलायला हवी, अशी अपेक्षा आहे. कारण कामगारांच्या पोटाला चिमटा बसतो तेव्हा तो जीवन-मृत्यू काहीच पाहात नाही. त्याच्यासाठी काम महत्त्वाचे आहे.
पापा आप फसें हुए लोगो को निकालकेही आना
- मुन्ना कुरैशी (रॅट मायनर्स टीममधला हिरो)
वकील हसन यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की आपल्याला कामगारांच्या सुटकेसासठी जायचे आहे. लगेच तयारी केली. सकाळी पाच वाजता बोगद्याच्या ठिकाणी पोहोचलो. आमचे काय होईल, अशी भीती न बाळगता एकच ध्येय होते की कामगारांना बाहेर काढायचे आहे. टीमने सांगितले आपण हे करूया. डोंगराएवढ्या संकटावर मात करायची आहे, असा आमच्या टीमने निर्धार केला. माझ्या मुलाने मला फोनवर सांगितले की, ''पापा आप फसें हुए लोगो को निकालकेही आना. मैं इंतेजार कर रहा हूं.'' त्यानंतर चोविस तासांमध्ये आम्ही मोहिम फत्ते केली. कुणाचे प्राण वाचवणे हे पुण्याचे काम आहे. असा आनंद पूर्वी कधीही झाला नाही.