मुंबई : बहुतांश खासगी दूरसंचार कंपन्या प्रीपेड ग्राहकांना २८ दिवसांचा रिचार्ज मासिक प्लॅन म्हणून विकतात. त्याबाबत तक्रारी वाढल्यामुळे ट्रायने गंभीर दखल घेत, किमान एक रिचार्ज प्लॅन २८ ऐवजी ३० दिवसांचा ठेवा, असे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. या निर्णयाची येत्या १ जूनपासून अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांच्या मासिक प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागते. एक महिन्याचे अतिरिक्त शुल्क कंपन्या त्यांच्याकडून आकारतात, असा ग्राहकांचा आक्षेप होता.
पोस्टपेड प्लॅनसाठी देयकसाखळी ही ३० दिवसांची, तर प्रीपेड ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मासिक प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. सर्व ग्राहकांसाठी ३० दिवसांची देयकसाखळी का नाही, असा सवाल उपस्थित करीत, ट्रायने याबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना केली होती. दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.
निर्णयाच्या अंमलबजावणीस ६० दिवसांची मुदतट्रायने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, टेलिकॉम कंपन्यांकडील किमान एक प्लॅन संपूर्ण महिन्यासाठी वैध असावा, तसेच प्रत्येक कंपनीच्या प्लॅनमध्ये महिन्यासाठी वैध असलेले एक विशेष व्हाउचर, कॉम्बो व्हाउचर ठेवावे लागेल. दर महिन्याला त्याचे नूतनीकरण करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात यावी. या निर्णयाच्या अंमलबजावणीस ६० दिवसांची मुदत देण्यात येत असून, १ जूनपासून एक महिना वैध असलेला रिचार्ज बाजारात आणावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.