नवी दिल्ली – तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या भारताने बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी आणल्याने तांदळाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या दराने अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. तांदळावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी या देशांनी भारताकडे केली आहे. सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपिंस या देशांनी तांदळाच्या वाढत्या किंमती पाहून भारताकडे निर्यातबंदी उठवण्याचं आवाहन केले आहे.
मिंट रिपोर्टनुसार, सिंगापूरने भारताकडे ११०००० टन तांदळाची निर्यात करण्याची विनंती केली आहे. जूनमध्ये इंडोनेशियाने अल निनोच्या पार्श्वभूमीवर देशातील अन्नपुरवठा कायम ठेवण्यासाठी भारतातून दहा लाख टन तांदूळ आयात करण्याची घोषणा केली होती. अल निनोमुळे हवामान चक्र विस्कळीत होऊन पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. त्याचबरोबर फिलीपिन्सही तांदूळ पुरवठ्यासाठी भारतावर अवलंबून आहे.
अलीकडेच संयुक्त राष्ट्र जागतिक खाद्य कार्यक्रमाअंतर्गत भारताकडे २ लाख टन तांदळाची मागणी करण्यात आली होती. कोविड १९ आणि युक्रेन युद्धामुळे खाद्य पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यात भारताने तांदूळ निर्यातबंदी निर्णय घेतल्याने खाद्य असुरक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताचा शेजारी देश बांगलादेशही तांदळासह काही कृषी उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी भारताशी बोलणी करत आहे. भारतात किरकोळ महागाई दराने गेल्या १५ महिन्यात उच्चांक गाठला आहे. त्यासाठी मोदी सरकारने किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीसह अनेक उपाय केले आहेत.
पुढील लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार किंमतीवर नियंत्रण लावण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. महागाई कमी करू असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. नुकतेच सिंगापूरने तांदूळ निर्यातीबाबत आम्ही भारत सरकारशी चर्चा करत आहोत असं म्हटलं. सिंगापूरमध्ये ३० देशातून तांदूळ आयात केला जातो. त्यात २०२२ मध्ये भारतातून आयात केलेल्या तांदळाचे योगदान ४० टक्के इतके होते. निर्यातबंदीमुळे बिगर बासमती तांदळाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सिंगापूरमध्ये बिगर बासमती तांदूळ जवळपास १७ टक्के आयात केला जातो.
शेजारील देशांची चिंता वाढली
भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. जागतिक व्यापारात भारताचा ४० टक्के हिस्सा आहे. भारत सरकारने २० जुलैरोजी बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी आणली. घरगुती किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किंमतीवर परिणाम झाला. बांगलादेश, नेपाळसह भारताचे शेजारील देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे.