नवी दिल्ली: जगाचे तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढल्यास करोडो लोकांसाठी जीवघेणे ठरू शकते. विशेषत: सिंधू नदी खोऱ्यात राहणारे भारत आणि पाकिस्तानमधील करोडो लोकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
संशोधनात असे दिसून आले आहे की, जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास उच्च आर्द्रतेसह उष्ण वारे वाहतील, जे मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असेल. वास्तविक, आर्द्रता जास्त असेल आणि उष्ण वारे किंवा उष्णतेच्या लाटा असतील तर घाम लवकर सुकत नाही, त्यामुळे उष्माघात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनानुसार, उत्तर भारत, पूर्व पाकिस्तान, पूर्व चीन आणि उप-सहारा आफ्रिकेत जास्त आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटा असतील.
भारत-पाकिस्तानमधील लोकांना अधिक फटका-
जगातील या प्रदेशात कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक बहुसंख्य राहतात, असेही संशोधनात म्हटले आहे. एअर कंडिशनरसारख्या सुविधांचा अभाव आणि उत्तम आरोग्य सेवांचा अभाव यामुळे या लोकांना जीवघेण्या उष्णतेचा अधिक फटका बसणार आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील तापमान आधीच १.१५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, ज्यामध्ये सर्वात मोठे योगदान पाश्चात्य देशांनी उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे आहे. यामुळेच २०१५मध्ये पॅरिस करार झाला. तेव्हा औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढण्यापासून मर्यादित ठेवण्याचा करार करण्यात आला होता. या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची भीती आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने (IPCC) व्यक्त केली आहे. IPCC ने जागतिक उत्सर्जन कमी करण्याचे सुचवले आहे. जागतिक एजन्सींच्या मते, मागील चार महिने हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण महिने ठरले आहेत. तसेच, २०२३ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.