नोएडा: गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, यावेळी एखाद्या थांबलेल्या गाडीला नाही, तर धावत्या गाडीला अचानक आग लागली. यावेळी गाडीस्वार डिलिव्हरी बॉयने उडी मारुन स्वतःचा जीव वाचवला. ही घटना परिसरातील कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओही व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नोएडातील कोतवाली सेक्टर-113 परिसरातील सेक्टर-78 च्या मुख्य रस्त्यावर घडली. या इलेक्ट्रिक मोटारसायकलवर बिग बास्केटचा डिलिव्हरी बॉय होता. अचानक गाडीला आग लागल्याने डिलिव्हरी बॉयने उडी मारुन जीव वाचवला. यावेळी रस्त्यावर उपस्थित लोकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाली.
इलेक्ट्रिक स्कूटरचा मालक डिलिव्हरी बॉय चंद्र प्रकाश यांनी सांगितले की, ते सिविक सेक्टर-80 मधील बिग बास्केट स्टोअरमधून स्टेडिया सोसायटीकडे सामानाची ऑर्डर देण्यासाठी जात होते. ते स्कूटरने सिव्हिटेक स्टेडियासमोर आले असता अचानक आग लागली. यानंतर त्यांनी स्कूटरवरून उडी मारून आपला जीव वाचवला. स्कूटर कोणती होती आणि स्कूटरला आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.