भारतीय सैन्याने अनेक जोखमीची कामे पूर्णत्वास नेली आहेत. अगदी मुंबईत भारतीय सैन्याने रेल्वेचे प्रवासी ये-जा करणारे पूल बांधले आहेत. मुसळधार पावसामुळे सिक्कीमच्या सीमावर्ती भागाचा संपर्क तुटला होता. या लोकांचा त्रास संपविण्यासाठी भारतीय जवानांनी जिवाची बाजी लावून १५० फुट लांबीचा सस्पेंशन पूल उभारला आहे. याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे.
सिक्कीममध्ये त्रिशक्ती कोअरच्या इंजिनिअरनी जवानांच्या मदतीने अत्यंत जोखमीच्या ठिकाणी पूल बांधला आहे. महत्वाचे म्हणजे ४८ तासांत या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. हा पायी चालण्याचा पूल असला तरी या भागात नदी पलीकडे अडकलेल्या लोकांसाठी संजिवनी आहे. परिसरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना मदत सामग्री उपलब्ध होणार आहे.
खालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा वेग ४० किमी प्रतितास एवढा जास्त होता. पाण्यात कोणी पाय रोवून उभे राहू शकणार नाही एवढा त्या पाण्याचा फोर्स होता. डोंगररांगांवरील पाणी येत असल्याने माती सोडून तिथे फक्त मोठमोठाले दगड होते. यामुळे तोल गेला तर पाण्यात पडून प्रवाहासोबत वाहताना दगडावर आदळून थेट मृत्यूच. अशा भीतीच्या वातावरणात भारतीय जवानांनी या नदीवर झुलता पूल उभारला आहे.
पहा हा पूल उभारतानाचा व्हिडीओ...