विद्यादान करणाऱ्या शिक्षकांच्या हाती खडूऐवजी दिला झाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 05:53 AM2022-06-06T05:53:33+5:302022-06-06T05:54:55+5:30
Kerala : या विद्यासेवकांपैकी एक असलेल्या के. आर. उषाकुमारी यांनी सांगितले की, गेली वीस वर्षे मी एका शाळेत अध्यापन करत होते. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आम्हाला वेगळ्याच शाळेत खडूऐवजी झाडूने करावी लागली.
तिरुअनंतपुरम : केरळच्या काही शाळांमध्ये शिक्षकांना आता शिकविण्याऐवजी सफाई कर्मचाऱ्याचे काम देण्यात आले आहे. या शिक्षकांच्या हाती खडूऐवजी झाडू देण्यात आला आहे. त्या राज्यातील आदिवासी तसेच मागासभागांत मल्टिग्रेड लर्निंग सेंटर (एमजीएलसी) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकल शिक्षकी शाळांमधील कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना विद्या स्वयंसेवक म्हटले जाते. असे ३४४ विद्या स्वयंसेवक असून त्यापैकी ५० जण अन्य शाळांमध्ये सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाले आहेत.
या विद्यासेवकांपैकी एक असलेल्या के. आर. उषाकुमारी यांनी सांगितले की, गेली वीस वर्षे मी एका शाळेत अध्यापन करत होते. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आम्हाला वेगळ्याच शाळेत खडूऐवजी झाडूने करावी लागली. आमच्या हातात गेल्या वर्षापर्यंत पुस्तके, डस्टर, खडू असे साहित्य असायचे. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आम्ही शिक्षकी पेशा गमावला आहे. कुन्नथूमाला या दुर्गम भागातील शाळेत त्या कार्यरत होत्या. आता त्या तिरुअनंतपुरम येथील एका सरकारी शाळेत अर्धवेळ सफाई कामगार म्हणून सेवा बजावतात.
विद्या स्वयंसेवकांची मल्टिग्रेड लर्निंग सेंटरमध्ये केरळ सरकारने नियुक्ती केली होती. एमजीएलसी योजना सरकारने गेल्या ३१ मार्च रोजी बंद केली. त्यामुळे त्या शाळांमधील सर्व विद्या स्वयंसेवक बेकार झाले असते. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्य शाळांमध्ये इतर कामांसाठी त्यांच्या नियुक्त्या केल्या असे केरळ सरकारच्या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
‘कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते’
विद्या स्वयंसेवक के. आर. उषाकुमारी सांगितले की, सफाईचे काम करण्यास मला संकोच वाटत नाही. कारण कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते. मात्र अध्यापनाचे काम ज्या पद्धतीने राज्य सरकारने आमच्या हातातून काढून घेतले त्याचे मला खूप दु:ख झाले. मी नव्या नोकरीतही तितक्याच आनंदाने काम करत आहे. मात्र तरीही माझी जुनी शाळा, तेथील विद्यार्थी यांची आठवण येतच राहाते.